Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम बारा वर्षे झाले तरीही रखडलेल्या स्थितीत आहे.न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश तसेच मंत्रीमहोदयांनी दिलेली आश्वासने आणि त्यानुसार प्रशासन व कंत्राटदार यांना दिलेले सूचना इशारे यांना हरताळ फासल्याचे दिसून येते.
म्हणूनच पळस्पे ते झाराप पर्यंतच्या ४५१ किलोमीटरच्या हायवेच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई-गोवा हायवे जनआक्रोश समिती गठित झाली आणि प्रशासन, राजकीय नेतृत्व,कंत्राटदार आणि स्थानिक आणि मुंबई-ठाण्यातील जनता यांच्याशी समन्वय साधून व्यापक प्रमाणावर पाठपुराव्याचे काम सुरू केले.
त्याचे फलित म्हणून पळस्पे ते कासू या टप्प्याच्या कामाचे कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदार जे एम म्हात्रे या कंपनीने कामाला सुरुवात तर केली,परंतु दिवसाला चार किलोमीटरचा टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना मागील एका महिन्यात केवळ अडीच किलोमीटरचे काम झाले आहे. कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील कामाला तर अजून सुरुवातही झालेली नाही. तसेच परशुराम घाट, संगमेश्वर, लांजा या भागात अजूनही मोठया प्रमाणात काम अपूर्ण आहे.
म्हणूनच,आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि समस्त कोकणकराना या विषयावर पुन्हा एकदा संघटित करून आंदोलन तीव्र करण्याची सुरुवात म्हणून मुंबई-गोवा हायवे जनआंदोलन समितीने त्यांचे पहिलेवहिले त्यावरील आंदोलन म्हणून रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी दुचाकी रॅली काढण्याचे जाहीर केले आहे.
दुपारी ४ वाजता रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून होऊन संध्याकाळी ६.३० च्या सुमारास खारपाडा टोल प्लाझा येथे समारोप होईल . खारपाडा येथे समारोप सभा होऊन पुढची दिशा जाहीर केली जाईल.
समितीच्या या आंदोलनात व उपक्रमात इतर संघटना संस्थांनी देखील सक्रिय सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले.
कोकणातील अनेक संघटनांनी या बाईक रॅलीला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यामध्ये कोकण कृती समिती, कोकण विकास समिती, कोकण विकास युवा मंच, रायगड मी मराठी प्रतिष्ठान, गवळी समाज सेवा संघ रायगड -रत्नागिरी, रायगड स्वराज्य संघटना, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना , कोकण प्रतिष्ठान- दिवा कोकण युवा संस्था, पनवेल एम आर असोसिएशन आणि पेण एम आर असोसिएशन यांचा समावेश आहे.
या रॅलीची सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी प्रसिद्धी व्हावी या हेतूने महामार्गावर आपले फोटोसह बाईक रॅलीचा फलक प्रिंट करून आपापल्या विभागात तर प्रदर्शित करू शकतात.फलकाचे ग्राफिक डिझाइन समितीतर्फे दिले जाईल. यामध्ये आपण स्वतःचे छायाचित्र व नाव किंवा आपल्या संघटनेचे नाव टाकू शकतात आणि फलक प्रदर्शित करू शकतो असे समितीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
Vision Abroad