Konkan Railway News | सकाळी ८ वाजता आरक्षण चालू होते आणि ८ वाजून १ मिनिटाला सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणीची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवते. असा प्रकार मागील २/३ दिवसांपासून गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी आरक्षण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चाकरमान्यांनी अनुभवला आहे. एका मिनिटात सर्वच गाड्यांतील सर्वच वर्गाचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ कशी काय होऊ शकते असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात असून दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशीही मागणी होत आहे.
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. हंगामात ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
तिकिटे मिळवण्यासाठी हे दलाल गैरमार्गाचा वापर सुद्धा करत आहेत. कधी रेल्वे कर्मचाऱ्यांना हाताशी धरून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वर हॅक करण्याचा प्रकार पण ते अवलंबत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
Facebook Comments Box
सर्व काळा बाजार आहे, रेल्वे ने लक्ष दिले पवहीजे