रत्नागिरी – बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. हल्लीच येथे जमिनीचा सर्व्हे करताना विरोधकांचा खूप मोठा विरोध पाहावयास मिळाला. त्यानंतर आंदोलने, उपोषण मोर्चा या मार्गाने कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता. मात्र आता विरोधकांनी विरोध करण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारचा अवलंब केला आहे.
ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमक्या त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.
सरकारने येथे जी दडपशाही चालवली आहे त्याविरोधात आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.