दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काल वाघाने म्हशीवर हल्ला केल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल सोमवारी तेरवण मेढे येथील शेतकरी लक्ष्मण घाटू काळे हे आपली गुरे चरवण्यासाठी सायंकाळी मेढे येथे माळरानावर गेले होते. सुमारे 4.30 च्या सुमारास अचानक एका पट्टेरी वाघाने एका म्हशीवर हल्ला चढविला. म्हशीच्या केलेल्या मोठ्या ओरड्याने जवळपास असणारे गुराखी लक्ष्मण यांनी तेथे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. एक पट्टेरी वाघाने एका म्हशीची मान आपल्या जबड्यात पकडली होती आणि म्हैस जिवाच्या आकांताने सुटकेचा प्रयत्न करत होती. हा प्रकार पाहून लक्ष्मण यांनी मोठ मोठ्याने ओरडा केल्याने वाघाने म्हशीला सोडून धूम ठोकली.
म्हशीच्या मानेत वाघाचे दात घुसल्याने रक्तस्त्राव झाला होता. मात्र आता उपचार केल्याने तिच्या जिवावरचा धोका टळला आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.