Konkan Railway : गणेशोत्सवासाठी नियमित गाड्यांची तिकिटे न मिळाल्याने विशेष गाड्यांची तिकिटे तरी मिळतील अशी आस धरून बसलेल्या बर्याच चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. IRCTC या संकेतस्थळावर आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. त्यानंतर अचानक आरक्षण चालू झाले आणि त्वरित फुल्ल झाले. या प्रकारामुळे या आरक्षणात गैरप्रकार झाला आहे असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 27 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार होते. आरक्षित तिकीटे मिळविण्यासाठी अनेक चाकरमानी आरक्षण सुरू होण्यापूर्वी लॅपटॉप मोबाईल वर लॉग इन करुन बसले होते. मात्र 8 वाजता जेव्हा आरक्षण चालू झाले तेव्हा आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. काही तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेने या गाड्यांचे आरक्षण पुढे ढकलले असेल आणि आरक्षणाची नवीन तारीख रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर होईल असा विचार करून अनेकांनी प्रयत्न सोडले आणि लॉग आउट झालेत. मात्र 15 मिनिटानंतर अचानक बूकिंग चालू झाली आणि नेहमीप्रमाणे 1/2 मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. या कारणाने अनेकांना आरक्षित तिकिटे भेटली नाहीत.
या प्रकारामुळे आरक्षणात गैरप्रकार झाला असल्याचे आरोप समाजमाध्यमांतून होत आहेत.
एकतर रेल्वेच्या आरक्षणाचे सर्व्हर हॅक करण्यात आले असेल किंवा रेल्वेचे काही अधिकारी आणि दलाल यांनी मिळून काही गैरप्रकार केला असल्याचा आरोप होत आहे.
रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत या प्रकाराबद्दल काही स्पष्टीकरण दिले नाही आहे, त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
पहिला प्रश्न म्हणजे या गाड्यांचे स्टेटस ‘Train Cancelled’ असे का दाखवले गेले? तांत्रिक अडचणी असल्यास ‘System/Server Error’ किंवा दुसरा स्पष्ट मेसेज का दाखविण्यात आला नाही?
दुसरे म्हणजे आरक्षण 15 मिनिटे उशिराने चालू करण्याचे पूर्वनियोजन असल्यास त्यासंबंधी आधीच जाहीर करण्यात का आले नाही?
या संबंधी स्पष्टीकरणाची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Vision Abroad