देवरुख : देवरुख आगाराच्या एका एसटी बसला येथील बोरसू येथे काल अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बस गाडी रस्त्याच्या बाजुच्या गटारात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र देवरुख आगाराच्या एसटी बसेसच्या दुरावस्थेमूळे या बसेस मधुन प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
व्हायरल चित्रफिती मधील चालकाचा दावा खरा?
गेल्याच आठवडय़ात याच आगारातील चालक अमित आपटे याने आगारातील बसेसच्या दुरावस्थेविषयी एक विडिओ बनवून तो समाजमाध्यमातून व्हायरल केला होता. ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन त्याने या विडिओ मध्ये केले होते. मात्र आगार व्यवस्थापनाने या चालकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला निलंबित करण्यात होते. या सर्व प्रकारामुळे देवरुख आगार वादात सापडले होते. देवरुखमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली होती.
तर मोठा अपघात झाला असता…
या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर घाट रस्त्यावर असा प्रकार घडला असता तर बस कित्येक फुटावरून दरीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असती. या प्रकरणी एसटी महामंडळाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
Vision Abroad