मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.
हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.
आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.
नेमके काय बोलले उदयनिधी?
तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.
“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.
Vision Abroad