सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
Vision Abroad