सिंधुदुर्ग, संपादकीय : नुकतीच बहुचर्चित नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसची अधिसूचना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ MSRTC तर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समजण्यात येणारा हा मार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. एकूण 11 जिल्ह्यातून जाणारा महामार्गामुळे नागपूर गोवा हे अंतर फक्त 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. या महामार्गाने पर्यटन विकास होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
कोकणाला किती फायदा?
हा महामार्ग तळकोकणातून जाणार असल्याने त्याचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होणार असल्याचा दावाही केला जात आहे. महामार्ग जेथून जातो त्या भागाचा विकास होतो ही गोष्ट साहजिक आहे. मात्र आखणी करताना एखाद्या भागाचा विचार करून त्याप्रमाणे आखणी केली असती तर त्या भागाचा किंवा प्रदेशाचा अधिक विकास होतो. मात्र या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नसल्याचे दिसत आहे.
गोव्याला तारक; कोकणास मारक
हा मार्ग कोल्हापूरहून फणसवडे, घारपी आणि बांदामार्गे सरळ गोव्याच्या सीमेला मिळणार आहे.या मार्गात कोकणातील एकही पर्यटनस्थळ किंवा शहर लागत नाही आहे. आंबोली घाटातही बोगदा पाडून हा मार्ग पुढे येणार आहे. त्यामुळे आंबोली पर्यटनस्थळ सुद्धा पर्यटकांना या मार्गात भेटणार नाही. या कारणाने नागपूर किंवा पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक हा महामार्गामुळे सरळ गोव्यात जाणार आहे. त्यामुळे कोकण पेक्षा गोव्याच्या पर्यटनास या महामार्गाचा अधिक फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या कोल्हापूर आंबोली या मार्गाने गोव्याला जाणारा पर्यटक नवीन एक्सप्रेस मार्गाचा वापर करणार असल्याने त्याचा आंबोली आणि सावंतवाडी पर्यटन स्थळांवर विपरीत परिणाम होणार आहे.
आंबोली ते सावंतवाडी इंटरचेंज गरजेचा
महामार्ग सावंतवाडी शहरातून किंवा शहराच्या अगदी जवळून गेला असता तर त्याचा खूप मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाला झाला असता. काही बाबींमुळे हे जर शक्य नसेल तर या महामार्गाला एक इंटरचेंज सांगलीच्या धर्तीवर किंवा आता आजरावासिय मागत आहेत त्या धर्तीवर सावंतवाडी साठी द्यावा. जेणेकरून सिंधुदुर्ग चे पर्यटन बहरेल आणि सिंधुदुर्ग वासियांना आणि कोकण वासियांना धार्मिक पर्यटनासाठी अजून एक महामार्ग उपलब्ध होईल असे मत येथील स्थानिक श्री. सागर तळवडेकर यांनी केली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad