



Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.
कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.
माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या :
- जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
- रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
- मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
- एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
- उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोकण रेल्वे
- प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
- अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
- कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
- कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
- मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.