



Konkan Railway: २५ वर्षांपूर्वी कोकणात रेल्वे आली आणि कोकणवासीयांसाठी एक जलद, परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला. सुरुवातीला प्रवासी संख्या कमी होती, त्यामुळे ज्या गाड्या या मार्गावर धावत होत्या त्या प्रवाशांच्या त्यावेळच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत्या. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली, गर्दी वाढत गेली आणि अधिक गाड्यांची मागणी होण्यास सुरवात झाली रेल्वे प्रशासनानेही गरज लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली. मात्र कोकण रेल्वे मार्गाचे एकेरीकरण आणि इतर मर्यादांमुळे त्यात अपेक्षित वाढ झाली नाही आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या मते सध्या कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालत असून आत गाड्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विलीनीकरण या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच हे शक्य आहे.
कोकण रेल्वे प्रवाशी संघटनांनी याबाबत आवाज उठवल्यामुळे प्रशासनाने सुद्धा यात लक्ष घातले असून त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे या गोष्टीला काही वर्षे जातील. मात्र तोपर्यंत रेल्वेकडे जी संसाधनाने आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग करून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजचे आहे. दुर्दैवाने तसे होत नसल्याचे दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या काही गाड्या कमी क्षमतेने धावत आहेत. या गाडयांना डबे जोडून त्याची क्षमता वाढवणे शक्य आहे. मात्र रेल्वे प्रशासन रेकची आणि डब्यांची उपलब्धता नसणे, पिट लाईनची कमी लांबी अशी थातुर मातुर कारणे देऊन हे टाळत आहे. खरेतर काही बदल करून या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे आत शिरता न आल्याने दरवाजावरून तोल जाऊन प्रवासी खाली पडण्याच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. कधी कधी भीती वाटत आहे कि गर्दीमुळे मुंब्रा स्थानकावर घडलेल्या घटनेसारखा अपघात घडेल. अशा घटना घडल्यावर जागे न होता हे अपघात घडू न देणे यासाठी प्रयत्न करणे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित आहे.
नवीन गाड्या येतील तेव्हा येतील. परंतु आताच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, तुतारी, मंगळुरू सुपरफास्ट, रत्नागिरी दिवा, सावंतवाडी दिवा, मडगाव वांद्रे, पुणे एर्नाकुलम, तेजस २२ डब्यांनी आणि वंदे भारत २० डब्यांची चालवल्यास दिवसाला एका दिशेला किमान ४० डबे वाढवता येतील. एका डब्यात सरासरी ८० प्रवासी धरल्यास दिवसाला किमान ३००० प्रवासी जास्त नेता येऊ शकतील. ही संख्या दोन नवीन गाड्यांएवढी आहे. रेल्वे उपलब्ध साधनसंपत्तीचा अपव्यय करत आहे.
–अक्षय महापदी
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती
