



मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.
बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.