Sawantwadi: ओटवणेतील अज्ञातांनी रातोरात उभारलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गूढ कायम.

   Follow us on        

ओटवणे (प्रतिनिधी): येथील देऊळवाडीमध्ये भिवसेन गावकर यांच्या घरासमोरील जागेत अज्ञात शिवप्रेमींनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात उभारल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच आश्चर्य व्यक्त होत असतानाच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मनात असलेली इच्छा अज्ञात शिवप्रेमींनी प्रत्यक्षात उतरवली, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरताच पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मनमोहक पुतळा पाहून अनेक जण नतमस्तक झाले आणि राजांनी मानाचा मुजरा अर्पण केला.

​दरम्यान, पुतळा उभारल्याची माहिती पोलीस प्रशासनालाही मिळाल्यानंतर नियमानुसार चौकशी करण्यात आली. मात्र, हा पुतळा नेमका कोणी उभारला याचा उलगाडा होऊ शकला नाही. तरीही स्थानिक युवकांनी अज्ञात शिवप्रेमींच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुतळ्याची पुढील जबाबदारी स्वीकारण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ओटवणे येथील रावळनाथ विद्यामंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पूर्वीपासून असला तरी सार्वजनिक ठिकाणीही पुतळा असावा, ही स्थानिकांची इच्छा होती. देऊळवाडीत नव्याने पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक शिवभक्तांनी गर्दी केली. पुतळ्याचे पवित्र्य जपण्याबरोबरच त्याची संपूर्ण जबाबदारी वाडीतील युवकांनी स्वीकारली असून, ही जबाबदारी सर्व ओटवणेकरांची असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका रात्रीत उभारलेल्या या पुतळ्याची ओटवणे दशक्रोशी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काळात येथे शिवजयंतीसह विविध कार्यक्रम जल्लोषात साजरे करण्यात येणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search