कोल्हापूर-आंबोली राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना टोल माफी

   Follow us on        

आजरा: कोल्हापूर-आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीच्या वादावर अखेर तोडगा निघाला असून आजरा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ‘टोलमुक्ती संघर्ष समिती’च्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आजरा तालुक्यातील घरगुती वापराच्या (प्रायव्हेट) चारचाकी गाड्यांना टोल पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या टोल वसुलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

​टोल माफीचा लाभ घेण्यासाठी आजरा तालुक्यातील ज्या खाजगी चारचाकी वाहनांना ‘MH 09’ पासिंग आहे, किंवा ज्यांच्याकडे गावातील गाडी असल्याचा सरपंच दाखला आहे, अशा वाहनधारकांना आधारकार्ड, फास्ट टॅग (FASTag) आणि आरसी बुकची (RC Book) झेरॉक्स प्रत जमा करावी लागणार आहे. याशिवाय, ऊस हंगामाच्या कालावधीत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही टोलमधून पूर्णपणे मुक्त करण्यात आले असून, संबंधित वाहनांची यादी साखर कारखाना प्रशासनाने देणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, पिवळी नंबर प्लेट असणाऱ्या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलतीचा मासिक अथवा वार्षिक पास देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

​या बैठकीदरम्यान टोल नाक्यावरील अंतर्गत कामे करण्याची मुभा प्रशासनाला देण्यात आली असून, पंचायत समितीपासून पाणी गटारात न जाता रस्त्यावरून वाहणे, पथदिवे दुरुस्ती आणि पश्चिम भागातील प्रलंबित कामे येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सर्व कामांच्या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ दिवसांत पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत झालेल्या कामांची पाहणी करूनच टोल प्रत्यक्ष सुरू करायचा की नाही, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि टोलमुक्ती संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search