​कोरोना काळात रद्द केलेले गाड्यांचे थांबे पूर्ववत होण्याच्या शक्यता वाढल्या

   Follow us on        

सावंतवाडी:कोरोना महामारीच्या काळात सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून बंद करण्यात आलेले प्रमुख एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सावंतवाडीकर रेल्वे प्रवाशांना लवकरच या संदर्भात आनंदाची बातमी मिळेल, असे आश्वासन देत त्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

​कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि माहिती अधिकार महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने अध्यक्ष विनोद नाईक यांनी मंगळवारी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सावंतवाडीकरांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केले. या बैठकीत प्रामुख्याने गरीब रथ एक्सप्रेस (१२२०२), राजधानी एक्सप्रेस आणि मंगळूरू एक्सप्रेस (१२४३४) या गाड्यांना सावंतवाडी येथे पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

​यापूर्वी २६ जानेवारी २०२५ रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश येडगे यांनी मुंबई येथे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले होते. आजच्या बैठकीत त्या जुन्या निवेदनाची आठवण करून देत, हे थांबे सावंतवाडीकरांसाठी किती गरजेचे आहेत हे पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

​कोरोना काळात बंद झालेल्या थांब्यांमुळे सावंतवाडी परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सध्या मुंबई किंवा इतर राज्यांत प्रवास करताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे हक्काचे थांबे पुन्हा सुरू व्हावेत, अशी जनतेची मागणी आहे. पालकमंत्र्यांनी यावर तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासित केले आहे. या गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू झाल्यास चाकरमान्यांसह सर्वांनाच खूप मोठा दिलासा मिळणार असून, पालकमंत्र्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे आता सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search