नवी दिल्ली: संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शिनी राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युरी समितीने २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे. हा १६ वा संसद रत्न पुरस्कार सोहळा यंदा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे पार पडणार असून, या सोहळ्यात १४३ पुरस्कारांचा टप्पा पार करून १५० वा पुरस्कार प्रदान केला जाईल. नागरी समाजाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सर्व विजेते स्वतः उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत असून राज्यातील पाच खासदारांना या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक श्रेणीत लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, लोकसभा खासदार नरेश गणपत म्हस्के, लोकसभा खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यात दोन महिला खासदारांचाही समावेश आहे. पुरस्कारांची घोषणा करताना ॲड. प्रियदर्शिनी राहुल यांनी भाजप खासदार स्मिता वाघ यांच्या कर्तव्यनिष्ठेचे विशेष कौतुक केले; कारण अत्यंत कठीण परिस्थितीत कर्करोगाशी (कॅन्सर) झुंज देत असतानाही, त्यांनी आपले केमोथेरपीचे सत्र पूर्ण करून संसदेच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली होती.
महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर महत्त्वाच्या खासदारांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री डॉ. चरणजितसिंग चन्नी या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तसेच राजस्थानचे पी. पी. चौधरी व लुम्बाराम चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे व विद्युत बरन महतो, उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल आणि गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांनाही हा पुरस्कार दिला जाईल. यासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४ संसदीय स्थायी समित्यांचाही गौरव केला जाणार आहे, ज्यामध्ये कृषी समिती (अध्यक्ष – डॉ. चरणजितसिंग चन्नी), वित्त समिती (अध्यक्ष – भर्तृहरी महताब), ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती (अध्यक्ष – सप्तगिरी शंकर उलाका) आणि कोळसा व खाण समिती (अध्यक्ष – अनुराग ठाकूर) यांचा समावेश आहे.


