सावंतवाडी: महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफ टॉप स्मार्ट सोलर योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या २,५०० ते १०,००० रुपयांच्या किरकोळ गुंतवणुकीत आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा (सोलर पॅनेल) बसवता येणार आहे. प्रति किलोवॅट ५० हजार रुपये खर्च असलेल्या या योजनेत केंद्र आणि राज्य सरकारकडून भरघोस अनुदान मिळत असल्याने, ग्राहकांना स्वतःचा अतिशय अल्प वाटा देऊन वीज बिलातून कायमची मुक्ती मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे महावितरणचे सक्रिय कनेक्शन असणे आवश्यक असून, त्यांचा मंजूर वीज भार किमान १ किलोवॅट असावा. तसेच, मागील एका वर्षाचा सरासरी मासिक वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असणाऱ्या आणि कोणतीही थकबाकी नसलेल्या घरगुती ग्राहकांना या योजनेमध्ये पात्र ठरवले जाणार आहे. पात्र ग्राहकांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या अनुदानाच्या रचनेनुसार, दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्राहकांना या यंत्रणेसाठी केवळ २,५०० रुपये गुंतवावे लागतील. अनुसूचित जाती (SC) व जमाती (ST) प्रवर्गातील ग्राहकांसाठी ५,००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गातील (General) ग्राहकांना अवघ्या १०,००० रुपयांमध्ये ही यंत्रणा बसवता येईल. उर्वरित सर्व खर्च केंद्र सरकार (३० हजार रुपये) आणि राज्य सरकार आपल्या वाट्यातून अनुदानाच्या स्वरूपात करणार आहे.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सोलर सिस्टीम बसवणाऱ्या अधिकृत विक्रेत्याला पुढील ५ वर्षांसाठी या प्रणालीच्या देखभालीची आणि कार्यक्षमतेची लेखी जबाबदारी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्राद्वारे घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना देखभालीची कोणतीही चिंता सतावणार नाही. या संधीचा लाभ घेण्यासाठी अद्ययावत वीज बिल, जागेचा मालकी हक्क पुरावा (७/१२ उतारा किंवा मालमत्ता कर पावती), आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि छताचे व मीटरचे छायाचित्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्र ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


