



रत्नागिरी:आरे-वारे समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. मृतांमध्ये ३ सख्ख्या बहिणींचा समावेश आहे आणि एकीच्या नवऱ्याचा समावेश आहे. या मुलींचे वडील शमसुद्दीन शेख हे दुबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून मुली व जावयाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तातडीने ते रत्नागिरी येथे येण्यासाठी निघाले असून त्यानंतर तिनही मुलींवर अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगण्यात आले.
उज्मा शमसुद्दीन शेख (१८), हुसेरा शमसुद्दीन शेख (२०), जेनब जुनेद काझी (२८) अशी या तीन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. तर जैनब यांचे पती जुनेद यांचाही आरे-वारे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. १९ जुलै रोजी शमसुद्दीन यांच्या ३ मुली व जावई हे दुचाकीवरुन आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले होते. समुद्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शमसुद्दीन यांच्या मुली सुट्टी असल्याने रत्नागिरीत आल्या होत्या. तर त्यांचे वडील हे दुबई येथे वास्तव्यासाठी होते. घटनेची तातडीने खबर शमसुद्दीन यांना कळविण्यात आली. यानंतर दुबई येथून ते भारतात येण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चारही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहेत. मुलींचे वडील आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.