



Konkan Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोलाड (महाराष्ट्र) – वर्ना (गोवा) दरम्यान जाहीर करण्यात आलेली Ro-Ro (Roll-on/Roll-off) कार-फेरी रेल्वे सेवा ही संकल्पना नाविन्यपूर्ण असली तरीही, सध्या ही सेवा सुरू करणे अत्यंत गैरसोयीचे आहे. म्हणून, ही सेवा तत्काळ रद्द करण्यात याव, त्याऐवजी, हीच वेळ, ट्रॅक स्लॉट, मनुष्यबळ आणि संसाधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आली आहे.
Ro-Ro सेवेसंदर्भातील मुख्य आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत:
१. वेळ आणि खर्चात फारसा फरक नाही:
रस्त्याने कोलाड ते वेर्णा प्रवासास सध्या १० ते १२ तास लागतात, तर Ro-Ro सेवेमुळे रेल्वेने १२ तासांचा प्रवास आहे. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ₹७,८७५ प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही.
२. एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य:
गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७ सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची गरज भासते, आणि एकत्र प्रवासाचा हेतूचसाध्य होत नाही.
३. मर्यादित साधनसंपत्तीचा अपव्यय:
Ro-Ro गाडी चालवण्यासाठी लोको पायलट, सहायक, ट्रेन मॅनेजर आदींचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्यबळ आणि मार्ग वापरून एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवता आली असती, जी अधिक उपयोगी ठरली असती.
४. आधीच व्यापलेल्या मार्गावर आणखी भार:
कोकण रेल्वे मार्ग गणपती काळात अत्यंत गजबजलेला आणि तणावाखाली असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करू शकते.
५. मधल्या स्थानकांवर चढ-उतार सुविधा नाही:
रो-रो सेवेसाठी कोलाड ते वेर्णा हा मार्ग थेट आहे. मार्गामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील स्थानकांवर गाड्या लोड किंवा अनलोड करता येणार नाहीत, ज्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना याचा लाभच होणार नाही.
वरील गोष्टी लक्षात घेता, आपणास विनम्र विनंती आहे की:कोलाड–वेर्णा Ro-Ro सेवा रद्द करण्यात यावी, आणित्याऐवजी तिथे लागणारे स्लॉट, कर्मचारी आणि साधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल.
आपण यावर गांभीर्याने विचार करून जनहितासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.