वेंगुर्ला | प्रतिनिधी: तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक घरगुती भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
अणसुर पाल मडकीलवाडी येथील रहिवासी वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात गेल्या काही काळापासून सतत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसल्या होत्या.
त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या उमेशने क्रूरतेची सीमा ओलांडली. तो घराच्या छपरावर चढला आणि तिथून त्याने आपल्या हातातील बंदुकीने आईच्या दिशेने थेट गोळी झाडली. ही गोळी वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीत घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०३ (३) (हत्या)
शस्त्र अधिनियम १९५९: कलम ३, २५, २७, २९
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१: कलम ३७ (१), १३५


