बेलापूर: सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे टर्मिनसमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी पुकारलेले उपोषण स्थगित केल्यानंतर, आज बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात एक महत्त्वाची सभा पार पडली. या सभेत बोलताना कोकण रेल्वेच्या (KRCL) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावंतवाडी टर्मिनसबाबत प्रशासकीय अडथळे स्पष्ट करत तूर्त या प्रकल्पाबाबत असमर्थता दर्शविली आहे. ‘वर्तमान परिस्थितीत सावंतवाडी येथे टर्मिनस उभारणे कोकण रेल्वेसाठी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य (Feasible) नाही,’ असे स्पष्ट मत मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (CCM) श्री. आशुतोष श्रीवास्तव आणि सिव्हिल विभागाचे श्री. एल. प्रकाश यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी लागणारा निधी हा अत्यंत मोठा असून, रेल्वेच्या सध्याच्या बजेटमध्ये हे शक्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सावंतवाडी स्टेशनचे पूर्ण क्षमतेच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद (Huge Finance) आवश्यक आहे. हा निधी उभारणे कोकण रेल्वेच्या मर्यादेबाहेर असल्याने, या विषयावर आता थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे अधिकाऱ्यांनी सुचवले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात गेला असून, मंत्रालयाकडून विशेष निधी मिळाल्याशिवाय टर्मिनसचे काम पुढे सरकणे कठीण दिसत आहे.
या गंभीर परिस्थितीनंतर आता कोकणातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या हितासाठी विद्यमान खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रश्न लोकसभेत लावून धरणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक मतदारसंघांत कोकणी मतदारांचे मोठे प्राबल्य असल्याने, तेथील खासदारांनीही या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वे मंत्रालयावर दबाव निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, प्रशासकीय पातळीवरून हा प्रश्न आता राजकीय इच्छाशक्तीच्या वळणावर येऊन थांबला आहे.
बेलापूर येथील आजच्या सभेत कोंकण रेल्वेचे अधिकारी आशुतोष श्रीवास्तव (कमर्शियल डिपार्टमेंट मॅनेजर),एल. प्रकाश (मेंटेनन्स आणि कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट),राजेंद्र कुमार शर्मा (यातायात विभाग),जुबेर पठाण (कोंकण रेल्वे सुरक्षा आयुक्त),राजेंद्र दिनकर घोलप (तक्रार निवारण अधिकारी), राजेश ठोंबल (ट्रॅफिक परिचालन),बाळासाहेब निकम (चिफ पर्सनल ऑफिसर).पी. जी. नायर ( डेप्यूटी चीफ इंजिनीअर )यांच्याशी बैठकीत चर्चा झाली
या वेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष आणि ZRUCC कमिटी सदस्य अभिजीत धुरत, सल्लागार व कोंकण रेल्वे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर, गणेश परब , अमित नार्वेकर, शक्तीप्रसाद शिरोडकर, सचिन धाडवे, वासुदेव गुरव, पवन पांचाळ, विक्रम येलवे, विनायक राणे, संतोष पालकर, रमण सावंत, सुनील उतेकर, तानाजी परब, अमित दुखंडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी कोकण रेल्वे संबधित इतरही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सावंतवाडी टर्मिनसची गरज
सावंतवाडी स्टेशनचे ‘टर्मिनस’मध्ये रूपांतर होणे हे केवळ तांत्रिक बदल नसून, संपूर्ण दक्षिण कोकणच्या दळणवळणासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी तो एक क्रांतीकारक टप्पा ठरणार आहे. टर्मिनसचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे यामुळे सावंतवाडी हे गाड्यांचे ‘उगमस्थान’ (Originating point) बनेल, ज्यामुळे कोकणातील प्रवाशांना आरक्षणासाठी स्वतंत्र कोटा उपलब्ध होऊन ‘कन्फर्म सीट’ मिळणे सोपे होईल. सध्या अनेक गाड्या गोव्याहून भरून येत असल्याने कोकणातील प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो, ही समस्या टर्मिनसमुळे कायमची सुटू शकते. तसेच, टर्मिनसमध्ये गाड्यांच्या देखभालीसाठी लागणारी ‘पिट लाईन’ आणि साफसफाईची यंत्रणा उपलब्ध असल्याने, मुंबई किंवा पुण्याहून येणाऱ्या गाड्या मडगावपर्यंत न नेता थेट सावंतवाडीत थांबवता येतील, ज्यामुळे मडगाव स्थानकावरील अतिरिक्त ताण कमी होईल.


