बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामतीमध्ये लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला जाऊन कोसळले. या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा कर्मचारीही उपस्थित होते.
बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘Lear Jet 45’ (VT SSK) या भाड्याने घेतलेल्या विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला असता, ते धावपट्टीच्या कडेला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला आहे. या प्रकरणाचे अधिक तपशील येणे अद्याप बाकी आहे.


