मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सुरुवातीला अवजड वाहनांना ‘नो एंट्री’ ची मागणी

   Follow us on        

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीचे सहा महिने केवळ प्रवासी वाहनांनाच या मार्गावरून वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) चे उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक मार्गावर सुरक्षेची संपूर्ण खात्री होईपर्यंत जड वाहने व मालवाहतूक तात्पुरती बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकी दृष्ट्या जटिल प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून बोर घाटातील वळणावळणाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र या मार्गावर बोगदे, उंच पूल, खोल दऱ्या तसेच हवामानातील बदल यांसारख्या संवेदनशील बाबी लक्षात घेता सुरुवातीच्या काळात वाहतुकीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने नव्या मार्गावरील सर्व तांत्रिक यंत्रणा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन सेवा, तसेच रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती यांची चाचणी प्रत्यक्ष वापरातून होणे आवश्यक असते. त्यामुळे सुरुवातीच्या सहा महिन्यांत केवळ हलकी व प्रवासी वाहने चालू दिल्यास मार्गाची क्षमता, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचे प्रभावी मूल्यमापन करता येईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः जड मालवाहतूक किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे संभाव्य अपघातांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे त्यांना तात्पुरती परवानगी देऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.

या मागणीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे आणि नव्या मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणे हा आहे. संबंधित यंत्रणांनी या सूचनेचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली असून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रारंभासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search