रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करण्यासाठी कोकणातील संघटना आक्रमक; खासदार अनिल देसाई यांची भेट

   Follow us on        

मुंबई:रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कोकणातील विविध संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आज शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कोकण विकास समिती, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (महाराष्ट्र) आणि जल फाउंडेशन कोकण विभाग यांच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांची शिवसेना भवन येथे भेट घेण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने आक्रमकपणे आपली बाजू मांडताना सांगितले की, रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी-दादर गाडी पूर्ववत न करणे हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे, त्यामुळे आता त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. हा प्रश्न केवळ एका गाडीपुरता मर्यादित नसून, मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील सुमारे २८ गाड्या बंद केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. परराज्यात जाणाऱ्या गाड्या दिवा किंवा पनवेल येथून सोडाव्यात आणि महाराष्ट्रातील सर्व गाड्यांना दादर किंवा सीएसएमटी स्थानकावरूनच प्राधान्य मिळावे, अशी आग्रही मागणी खासदार महोदयांकडे करण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विशेषतः कोकणातील खासदार-आमदारांनी या विषयावर एकत्र येऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे दाद मागणे गरजेचे असल्याचे संघटनांनी नमूद केले. तसेच, गरज पडल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. खासदार अनिल देसाई यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशा व्यापक संघर्षाची आवश्यकता असल्याचे मान्य केले. या प्रसंगी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, अक्षय महापदी, दिलीप कदम, संतोष भोसले, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक, जल फाउंडेशनचे नितीन जाधव आणि प्रमोद बागवे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search