मालवण, १९ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार प्रमुख समुद्री किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र (Study Centre) उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हे केंद्र मालवणात स्थापन होणार असून, शिवकालीन व्यापार, आरमार व्यवस्था, या किल्ल्यांच्या रणनीतिक महत्त्व आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा वैज्ञानिक अभ्यास होईल. यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शन, व्याख्याने, संशोधन प्रकल्प आणि या वारशाचे जागतिक स्तरावर प्रसार होण्यास मदत होईल.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनी या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजुरीमुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
या केंद्रामुळे शिवरायांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि सिंधुदुर्गच्या सागरी वारशाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, स्थानिक इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदेशीर ठरेल.


