कोल्हापूर: कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेले हवाई सर्वेक्षण (एरियल सर्व्हे) पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या पुढील कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधून हा रेल्वेमार्ग जाणार असल्याने अनेक मोठे बोगदे आणि उंच पूल उभारण्याचे मोठे आव्हान या प्रकल्पासमोर आहे. हवाई सर्वेक्षणातून मार्गाची अचूक आखणी, स्थानकांची संभाव्य ठिकाणे आणि बोगद्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जमिनीवरून सर्वेक्षण करणे अवघड ठरत होते. त्यामुळे आधुनिक LiDAR तंत्रज्ञानाचा वापर करून हवाई सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून जमिनीची उंची, झाडे, अडथळे आणि भूभागाचे सविस्तर मॅपिंग करण्यात आले असून त्यामुळे रेल्वेमार्गाचे ‘अलाइन्मेंट’ निश्चित करणे अधिक सुलभ झाले आहे. अंतिम अहवालानंतर भू-संपादन प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटकातील काही भाग थेट कोकण रेल्वेशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. साखर, गूळ आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूक जलद गतीने बंदरांपर्यंत पोहोचू शकणार असल्याने औद्योगिक व आंतरराष्ट्रीय व्यापारालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रस्तावित मार्गामुळे बाजारभोगाव आणि शाहूवाडी परिसरात नवीन स्थानके उभारली जाण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या रेल्वेमार्गामुळे कोकण, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक यांतील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार असून पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.


