हरियाणा: तमाम भारतीयांचे आदर स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नको त्या ठिकाणी लावून अपमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकरी (हरियाणा) येथील मिलन बॅन्केट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा शौचालयाच्या दरवाज्यांवर लिंग-सूचक चिन्हांसोबत (HE/SHE) वापर केल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लाखो लोकांनी याला ऐतिहासिक व्यक्तींचा आणि हिंदू आस्थेचा अपमान ठरवले आहे.व्हिडीओमध्ये दिसते की, पुरुष शौचालयाच्या दरवाज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महिला शौचालयावर महाराणी पद्मिनी यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मुघलांविरुद्ध लढणारे महान योद्धा म्हणून पूजले जातात, तर महाराणी पद्मिनी (पद्मावती) या चित्तोडच्या राजपूत राणी आणि धैर्य व बलिदानाच्या प्रतीक मानल्या जातात.
सोशल मीडियावर अनेकांनी याला “निष्काळजीपणा नव्हे, तर जाणीवपूर्वक अपमान” असे म्हटले आहे. काहींनी बॅन्केट हॉल व्यवस्थापनाकडून तात्काळ प्रतिमा काढून टाकणे, सार्वजनिकरीत्या माफी मागणे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”हा केवळ चूक नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांवर प्रहार आहे,” असे एका युजर्सने म्हटले आहे.
अद्यापपर्यंत बॅन्केट हॉलच्या व्यवस्थापनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.ही घटना फतेहपूर सिकरी किंवा जवळच्या परिसरात असल्याचे काही पोस्टमध्ये नमूद केले जात असले तरी मुख्यतः हरियाणातील सिकरी येथे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे ऐतिहासिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी योग्य आदराने वापर व्हावा, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या छायाचित्रांचा अपमानजनक वापर – Kokanai https://t.co/spidlVPGhb pic.twitter.com/BUFSDMjYkp
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) February 23, 2026


