Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीत. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता कोकणातील प्रीमियम समजल्या जाणाऱ्या २२१२० मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेसला बसला आहे. २१ फेब्रुवारी रोजी सुटलेली ही गाडी तब्बल १० तास ५७ मिनिटे (सुमारे ११ तास) उशिराने मुंबईत पोहोचली. विशेष म्हणजे, ही गाडी नियोजित CSMT टर्मिनसऐवजी दादर येथेच थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मडगाववरून सुटणारी ही हायस्पीड गाडी मूळ वेळेपेक्षा ६ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना झाली होती. प्रवासादरम्यान हा उशीर वाढतच गेला आणि दादरला पोहोचेपर्यंत तो जवळपास ११ तासांवर गेला. प्रीमियम तिकीट दर मोजूनही प्रवाशांना रात्रभर स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये ताटकळत राहावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ठराविक गाड्यांवर अन्यायाचा संशय
प्रवाशांनी आरोप केला आहे की, कोकण रेल्वे मार्गावरील काही ठराविक गाड्या वारंवार उशिराने धावत आहेत.
११०९९ कुर्ला–मडगाव एक्सप्रेस ही गाडी नियमितपणे रात्री १२.४५ वाजण्याऐवजी पहाटे ५ ते ६ वाजता सुटत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दोन महिने आधी आरक्षण करूनही वेळेवर पोहोचण्याची खात्री उरलेली नसल्याने तळकोकणातील चाकरमान्यांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न
कोकणातील प्रवाशांचे हाल होत असताना स्थानिक खासदार आणि आमदार गप्प का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “असा प्रकार इतर राज्यांत घडला असता, तर तेथील लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
रेल्वे प्रशासनावर टीका
वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. ‘प्रीमियम सेवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचीच अशी अवस्था असेल, तर इतर गाड्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याची आणि प्रवाशांचा मानसिक छळ सुरू असल्याची टीका होत आहे.
काही प्रवाशांनी तर वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देण्यासाठी तेजस वारंवार उशिराने चालवली जाते का? असा संशयही व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.


