दिवा: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने दिवा – चिपळूण – दिवा या मार्गावर विशेष अनारक्षित मेमू (MEMU) ट्रेन चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी १ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दोन्ही दिशांनी धावणार आहे.
गाडी क्रमांक आणि मार्ग
गाडी क्र. ०११५९ (दिवा ते चिपळूण): ही गाडी रात्री २३:२५ वाजता दिवा स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता चिपळूणला पोहोचेल.
गाडी क्र. ०११६० (चिपळूण ते दिवा): ही गाडी दुपारी १५:३० वाजता चिपळूणहून सुटेल आणि रात्री २३:१० वाजता दिव्याला पोहोचेल.
प्रवासातील सर्व थांबे (स्थानके):
या विशेष मेमू ट्रेनला प्रवासादरम्यान खालील स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे:
दिवा (सुरुवात), निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी आणि चिपळूण (अंतिम स्थानक).
या विशेष फेरीमुळे दिवा ते चिपळूण दरम्यानच्या अनेक छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, ही गाडी पूर्णपणे ‘अनारक्षित’ (General) स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची गरज नसून रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीतून थेट तिकीट काढून प्रवास करता येईल. केवळ ८ दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेली ही सेवा रात्रीच्या वेळी प्रवास करून सकाळी कोकणात पोहोचू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी अतिशय सोयीची ठरणार आहे.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी आणि स्थानिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


