मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, अत्यंत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही गाड्यांमध्ये ३-टायर इकॉनॉमी श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार असून, त्यामुळे या गाड्यांची एकूण क्षमता आता २२ ऐवजी २३ एलएचबी (LHB) डब्यांची होणार आहे.
या बदलाची अंमलबजावणी मडगाव-मुंबई ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (२२११२) साठी २४ फेब्रुवारी २०२६ पासून, तर मुंबई-मडगाव ‘कोकणकन्या’ (२२१११) आणि ‘मांडवी एक्सप्रेस’ (१०१०४/१०१०३) च्या दोन्ही फेऱ्यांसाठी २५ फेब्रुवारी २०२६ पासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे ३-टायर इकॉनॉमी श्रेणीतील डब्यांची संख्या आता २ वरून ३ झाली आहे. सुधारित रचनेनुसार या गाड्यांमध्ये १ कंपोझिट डबा (प्रथम श्रेणी + २-टायर वातानुकूलित), १ स्वतंत्र २-टायर वातानुकूलित डबा, ४ डबे ३-टायर वातानुकूलित, ३ डबे ३-टायर इकॉनॉमी, ७ शयनयान श्रेणीचे डबे आणि ४ सामान्य डबे असतील. याव्यतिरिक्त १ पँट्री कार, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर डबा जोडलेला असेल.
कोकणकन्या आणि मांडवीच्या क्षमतेत झालेली ही वाढ पाहता, आता दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्सप्रेस’चेही डबे २२ पर्यंत वाढवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून, आरक्षणासाठी होणारी ओढाताण कमी होण्यास मदत होईल.


