सावंतवाडी: कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने आगामी काळात चालवण्यात येणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू विशेष गाडीच्या (०९४२४/०९४२३) थांब्यांच्या यादीतून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचा थांबा वगळण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यापूर्वी या गाडीला सावंतवाडी येथे थांबा दिला जात होता, मात्र २७ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२६ या कालावधीत धावणाऱ्या विशेष फेऱ्यांसाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप केला जात आहे.
कुठल्याच लॉजिक मध्ये बसत नाही
या गाडीला यापुर्वी असलेले जवळ जवळ सर्वच थांबे तसेच ठेवून सावंतवाडीचा थांबा काढण्यात आला आहे. कमी प्रवासी संख्या असलेल्या थांब्याना हात न लावता चांगली प्रवासीसंख्या footfall असलेल्या स्थानकाचा थांबा काढला हे कोणत्याही लॉजिक मध्ये बसत नाही.
जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप
कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र हद्दीतील स्थानकांमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत ५ व्या स्थानावर असलेल्या सावंतवाडी स्थानकाचे या वर्षीचे उत्पन्न सुमारे १८ कोटी रुपये आहे. पुढील वर्षात हा आकडा २० कोटींच्या पार जाण्याची शक्यता असून, तसे झाल्यास स्थानकाला NSG-3 ही उच्च श्रेणी प्राप्त होईल. मात्र, ही श्रेणी मिळू नये आणि स्थानकाचा विकास होऊ नये, यासाठीच राजधानी, गरीब रथ आणि मंगळुरू स्पेशल सारख्या महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे जाणून बुजून नाकारले जात असल्याचे बोलले जात आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी)ने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सावंतवाडीच्या महत्त्वावर घाला घातला जात आहे. कोकण रेल्वे (KR) प्रशासनाकडून होणारा हा अन्याय थांबवून तात्काळ सावंतवाडी येथे थांबा बहाल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
उत्पन्न असूनही सुविधांपासून वंचित ठेवण्याच्या या धोरणामुळे पर्यटनावर आधारित असलेल्या या भागातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.


