मुंबई: मुंबई शहराला भेडसावणाऱ्या वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी आणि पर्यावरणपूरक उपाय शोधण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी मांडलेल्या ‘मुंबई जल मेट्रो’ (Mumbai Water Metro) प्रकल्पाच्या प्रस्तावाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, सदर विषय पुढील तपासणीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग केला आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि इतर गृहनिर्माण प्रकल्पांमुळे भविष्यात रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार वायकर यांनी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही जलवाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. कोचीमध्ये हा प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरला असून, तेथील सुरक्षितता आणि कार्यक्षमता पाहता मुंबईच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून जलद सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे वायकरांनी पत्रात नमूद केले होते.
मुंबई महानगर क्षेत्राची (MMR) लोकसंख्या २०३० पर्यंत सुमारे २.९ कोटी आणि २०३७ पर्यंत ३.८ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ रस्ते वाहतूक पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे जल मेट्रोसारखा आधुनिक, इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक पर्याय मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार वायकर यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले असून, हा प्रकल्प मार्गी लागल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.


