सर्व आशा मावळल्यात! दादर रत्नागिरी पाठोपाठ अजून एक राज्यांतर्गत गाडी मुंबईकरांनी कायमची गमावली

   Follow us on        

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची आणि मुंबईकर चाकरमान्यांची हक्काची असलेली ‘सह्याद्री एक्सप्रेस’ पुन्हा तिच्या मूळ स्वरूपात (कोल्हापूर ते मुंबई) धावेल, ही आशा आता पूर्णपणे मावळली आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, ही गाडी आता कायमस्वरूपी ‘कोल्हापूर-खडकी एक्सप्रेस’ (गाडी क्र. ११४१९/२०) म्हणून चालवली जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेली ही सेवा, त्यानंतर ‘स्पेशल’ म्हणून काही काळ सुरू राहिली. मात्र, आता ती नियमित करताना तिचा मार्ग खडकीपर्यंतच मर्यादित करण्यात आला आहे. यामुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजरपाठोपाठ मुंबईला जोडणारी अजून एक महत्त्वाची गाडी मुंबईकरांनी कायमची गमावली असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

​या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या भागातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. सध्या महालक्ष्मी एक्सप्रेसवर प्रवाशांचा प्रचंड ताण असून, एलएचबी (LHB) कोचमुळे डब्यांची संख्या कमी झाल्याने तिथे कायम वेटिंग लिस्ट असते. अशा परिस्थितीत सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सुरू होणे गरजेचे होते. मात्र, रेल्वेने ‘झिरो टाइम टेबल’च्या नावाखाली या गाडीचा मुंबईपर्यंतचा प्रवास कापून तो खडकीपर्यंतच ठेवला आहे. जरी ही गाडी आता नियमित झाल्याने प्रवाशांना वाढीव तिकीट दरातून दिलासा मिळाला असला, तरी प्रवासाचे मुख्य उद्दिष्ट असलेल्या मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रवाशांना पुण्यातून इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.

​या अन्यायाविरुद्ध रेल्वे प्रवासी संघटना आणि सल्लागार समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरवत यांनी ही गाडी किमान पनवेल, दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करण्याची मागणी लावून धरली आहे. विशेषतः नवी मुंबईचा विस्तार आणि तिथे वाढलेली रोजगाराची संधी पाहता, ही गाडी पनवेलमार्गे सोडल्यास हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र, प्रवाशांच्या या रास्त मागणीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, मुंबईची कनेक्टिव्हिटी कमी होत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search