सिंधुदुर्ग: शक्तीपीठ महामार्गाचे नवीन फेररेखांकन आता केगड-कुंभवडेतून तळकट, झोळंबेमार्गे डेगवे-बांदा अशा अतिसंवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या भागातून करण्याचे निश्चित झाले आहे. या प्रस्तावित मार्गामुळे कोकणातील अमूल्य वनसंपदा आणि दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. महामार्गाच्या या नवीन आराखड्यामुळे निसर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली असून प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डॉ. परुळेकर यांनी माहिती दिली की, ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तिथे असंख्य मोठ्या वृक्षांची बेसुमार तोड केली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असून महामार्गाच्या कामामुळे इथल्या पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा हा ऱ्हास स्थानिक पर्यावरण आणि जनजीवनासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला असून या वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे.
या परिसरातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, नुकतेच सरमळे आणि तळकट यांसारख्या गावांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा ‘किंग कोब्रा’ (नागराज) या सापाचे दर्शन घडले आहे. ज्या भागात नागराज, पट्टेरी वाघ, बिबट्या, हत्ती आणि गवे यांसारख्या वन्यजीवांचा मुक्त वावर आहे, तिथे महामार्ग बांधणे पर्यावरणासाठी विनाशकारी ठरेल. वन्यजीवांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे भविष्यात मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना डॉ. परुळेकर म्हणाले की, किंग कोब्राचे वारंवार दर्शन घडणे हा निसर्गाचा एक मोठा संकेत आहे. मात्र, अघोरी विद्या आणि भोंदू बाबांच्या नादी लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निसर्गाचे आणि ईश्वराचे हे संकेत कळणार आहेत का, असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. महामार्गाच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे हे आक्रमण स्थानिक जनतेच्या संतापाचे कारण ठरत असून, निसर्गप्रेमींकडून या मार्गाला विरोध दर्शवला जात आहे.
Photo Credit – AI


