मुंबई:कोकणातील रेल्वेचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आगामी रविवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबईत भव्य ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र’ यांच्या कार्यकारिणी सभेत या परिषदेची संकल्पना मांडण्यात आली असून, आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
२८ ते ३० गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर
या परिषदेचा मुख्य हेतू दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि सह्याद्री एक्सप्रेस यांसारख्या महाराष्ट्रातील बंद केलेल्या किंवा शहरांतील मुख्य स्थानकाबाहेर (उदा. पनवेल, पुणे किंवा दिवा) फेकलेल्या २८ ते ३० महत्त्वाच्या गाड्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, या अन्यायाविरुद्ध प्रशासनाला इशारा देण्यासाठी राज्यातील सर्व प्रवासी संघटनांना एका छत्रछायेखाली आणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प आणि सुविधा
केवळ गाड्याच नव्हे, तर कोकण रेल्वे मार्गावरील दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अपूर्ण काम आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा अभाव यावरही या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी या परिषदेचे नियोजन केले असून, कोकणवासीयांनी या लढ्यात आता एकजुटीने सहभागी होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सामान्यांचा लढा, सामान्यांसाठी!
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून, तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य कष्टकरी आणि कोकणी चाकरमान्यांनी पुकारलेला हा हक्काचा लढा आहे. या परिषदेला कोणतेही मोठे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे ही परिषद यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि आर्थिक नियोजनाची गरज आहे.
”ही परिषद यशस्वी करण्यासाठी स्वतः आयोजक म्हणून पुढे यावे. तसेच ज्यांना या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा आहे किंवा आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोकणच्या रेल्वे विकासासाठी आणि हक्काच्या प्रवासासाठी होणारी ही परिषद कोकण रेल्वेच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरण्याची शक्यता आहे.


