मुंबई: कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी रेल्वे गाडीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. कोव्हिड काळात बंद झालेली आणि सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पुन्हा एकदा दादरहून चालवण्यात यावी, या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली असून, यासंदर्भात तांत्रिक बाबींची (Operational Feasibility) तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरातील चाकरमानी या गाडीसाठी पाठपुरावा करत आहेत. सध्या ही गाडी दिवा टर्मिनल येथून सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या या भावना लक्षात घेऊन खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर पत्र दिले होते. तसेच प्रत्यक्ष भेटीत त्यांनी ही गाडी केवळ दादरहूनच नाही, तर दादर, अंधेरी, बोरिवली आणि वसई मार्गे कोकणात नेण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी वायकर यांना पत्राद्वारे कळवले आहे की, रेल्वे प्रशासन या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत आहे. गाड्यांचे वेळापत्रक आणि रेल्वे मार्गावरील उपलब्ध जागा यांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. “कोकणवासीयांची ही मागणी रास्त असून, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करू आणि ही गाडी लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा विश्वास खासदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे आता पुन्हा एकदा दादरहून रत्नागिरीसाठी गाडी धावण्याची आशा पल्लवित झाली आहे.


