छत्रपती संभाजीनगर: राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या बहुचर्चित शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आता हा मार्ग ८५५ किलोमीटर लांबीचा होणार आहे. पूर्वी हा प्रकल्प १२ जिल्ह्यांसाठी प्रस्तावित होता, मात्र सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४० तालुके आणि सुमारे ४०० गावांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांवर येणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून हा मार्ग सुमारे २७० कि.मी. धावणार आहे. यवतमाळ, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये या महामार्गाची लांबी प्रत्येकी १०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल.
दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवरच जमीन मालकांना मोबदला देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. जुन्या आखणीनुसार काही गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली असली, तरी नव्या बदलांमुळे आणि मोबदल्याच्या अनिश्चिततेमुळे पेच कायम आहे.


