मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-परबवाडी येथे एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे. भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर आकाशातून सुमारे ५ किलो वजनाचा बर्फाचा एक भलामोठा तुकडा कोसळला. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देऊळकर कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. हा बर्फाचा गोळा इतक्या वेगाने आणि शक्तीने पडला की, त्याने घराच्या छपराची कौले आणि लाकडी रिप तोडून थेट स्वयंपाकघरात प्रवेश केला.
ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील महिला अर्चना देऊळकर या स्वयंपाकघरातच होत्या. सुदैवाने, बर्फाचा हा तुकडा त्यांच्या अंगावर न पडता बाजूला पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली आणि ग्रामस्थांनी देऊळकर यांच्या घराकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा परिसरात कोणत्याही प्रकारचे ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचे कोणतेही संकेत नव्हते. घरच्या आजूबाजूला कोणताही उंच भागही नाही होता. रखरखत्या उन्हात अचानक आकाशातून एवढा मोठा बर्फाचा तुकडा पडल्याने हे नेमके काय गौडबंगाल आहे, यावर गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच देवली गावचे सरपंचांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा तुकडा नैसर्गिक गारांचा प्रकार आहे की विमानातून पडलेला साचलेला बर्फ (Blue Ice), याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या रहस्यमय घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुराव्यासाठी देऊळकर यांनी तो बर्फाचा तुकडा सुरक्षितपणे फ्रीजमध्ये जतन करून ठेवला असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात या ‘आस्मानी’ संकटाचीच चर्चा रंगली आहे.


