सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत बंद

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी  येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेले डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत  बंद पडले आहेत. मागील नऊ दिवसांपासून ही यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना आपला डबा शोधण्यासाठी पुन्हा एकदा धावपळ करावी लागत आहे.

​प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये या स्थानकावर डिजिटल कोच इंडिकेटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही यंत्रणा कार्यान्वित झाली, मात्र तंत्रज्ञानातील बिघाडामुळे अवघ्या दीड महिन्यातच ती निकामी झाली आहे. सध्या हे इंडिकेटर असून नसल्यासारखेच आहेत.

​स्थानकावरील ही महत्त्वाची सुविधा बंद असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यात सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी यासंदर्भात रत्नागिरी येथील RRM (प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक) कार्यालयात रीतसर तक्रार नोंदवली आहे.

​”रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारली आहे, मात्र तिची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावी,” अशी मागणी मिहीर मठकर यांनी केली आहे.

​कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना कोच इंडिकेटर नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडी आल्यावर डबा कुठे येईल हे समजत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. आता रेल्वे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन हे इंडिकेटर लवकरात लवकर सुरू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search