संगमेश्वर रोड स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्यासाठी आग्रही मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ९ महत्त्वाच्या साप्ताहिक गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी ‘निसर्गरम्य चिपळूण’ आणि ‘निसर्गरम्य संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपच्या वतीने रत्नागिरी येथे कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश बापट यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या मांडल्या.

​पर्यटन आणि ऐतिहासिक महत्त्व

संगमेश्वर तालुका हा सुमारे १९६ गावांचा विस्तार असलेला मोठा परिसर आहे. या भागात मार्लेश्वर, कर्णेश्वर यांसारखी धार्मिक स्थळे, तसेच प्रचितगड, भवानी किल्ला आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक (शृंगारपूर) यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक येत असतात. सध्या नेत्रावती, पोरबंदर आणि जामनगर एक्सप्रेसला मिळालेल्या थांब्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणि रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या ९ गाड्यांच्या थांब्याची मागणी

वाढता प्रतिसाद पाहून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खालील ९ गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे:

​केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस

​अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस

​इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस

​हापा सुपरफास्ट एक्सप्रेस

​बांद्रा–मडगाव एक्सप्रेस

​श्रीगंगानगर एक्सप्रेस

​जबलपूर–कोकण एक्सप्रेस

​दुरंतो एक्सप्रेस

​मरूसागर एक्सप्रेस

​प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

या गाड्यांना थांबा मिळाल्यास स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेलच, शिवाय परिसराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळेल. रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संदेश जिमन आणि समस्त संगमेश्वरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेत रुपेश मनोहर कदम (सायले) व अन्य सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search