पुणे: पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास २२२२५ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकातील ‘डायमंड क्रॉसिंग’वर ही दुर्घटना घडली असून, गाडीचा चौथा कोच डिरेल झाला. या कोचच्या ट्रॉलीचे (चाकांचे संयोजन) रुळावरून खाली उतरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गाडीचा वेग कमी असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत संबंधित डायमंड क्रॉसिंगचे अपग्रेडेशन करण्याचे काम आधीच नियोजित होते, त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याने तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने तातडीने पर्यायी रेकची व्यवस्था केली. या अपघातामुळे पुणे विभागातील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, मुख्य स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
View this post on Instagram











