Category Archives: सिंधुदुर्ग

वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेचा अहवाल महिनाभरात

   Follow us on        

सिंधुदुर्ग: ​सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी तिलारी प्रकल्पावर आधारित ‘वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजना (टप्पा-२)’ आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

​या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणीपंप, बीज खर्च कमी करण्यासाठी १५०० केव्हीए क्षमतेच्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींसह सविस्तर अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नाबार्डच्या माध्यमातून निधी उभारणे अत्यावश्यक असल्याने या योजनेचा प्रस्ताव वित्तपुरवठ्यासाठी शासनाकडे त्वरीत सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

​सागरी किनारपट्टीवरील वेंगुर्ला-चिपी परिसरात गोड्या पाण्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित असल्यामुळे या भागातील अनेक ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पातून पाणीपुरवठा मिळण्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार, पर्यटन उद्योगाची वाढ आणि नवीन व्यावसायिक प्रकल्पामुळे पाण्याची मागणी अधिक वाढणार असल्याने ही योजना अतिशय दूरदृष्टीची ठरणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

आंबोली घाटात अपघात! तरुण ४०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरू

   Follow us on        

​आंबोली:

वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेले बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील डॉ. आयूब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डॉ. सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोलीत आले होते. सायंकाळी महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, लघुशंकेसाठी ते दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले आणि अचानक त्यांचा तोल गेल्याने ते थेट दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने हा अपघात पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ याची माहिती दिली.

​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथкаसह आणि आंबोलीतील ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेला संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली.

​रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताच्या ठिकाणीच संबंधित व्यक्तीचा मोबाईल राहिल्यामुळे मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले आहे. या प्रतिकूल हवामानामुळे थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी लवकर पुन्हा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

मालवण – पंढरपुर – अक्कलकोट एसटी बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: एसटी महामंडळाच्या मालवण आगारामार्फत मालवण ते अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून कोकणातील प्रवाशांना आता बस बदल न करता थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.

​ही बस मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे, तर अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान आचारा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख ठिकाणे येणार आहेत.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगारामार्फत करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नामांतरणाच्या प्रक्रियेला वेग; केंद्र सरकारने मागवले अभिप्राय

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’ चे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, नामवंत संसदपटू आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री स्व. मधू दंडवते यांनी कोकणाच्या विकासात, विशेषतः कोकण रेल्वेच्या उभारणीत दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती.

या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नामकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाच्या २६ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सावंतवाडी टर्मिनसचे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. या मान्यतेनंतर राज्याचे अप्पर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) संजय सेठी यांनी १६ जून २०२६ रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून नामकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती.

महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावावर केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाचे अवर सचिव कुंदन कुमार यांनी २७ जुलै २०२६ रोजी एक कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. या ज्ञापनाद्वारे केंद्र सरकारच्या नियमांनुसार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या या प्रस्तावाची प्रत संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया) आणि टपाल विभागाकडून अधिकृत मते व अभिप्राय मागवले आहेत. या सर्व संबंधित विभागांकडून मंजुरी व अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नव्या नामकरणाची अंतिम आणि अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

धक्कादायक! शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले कोसळली

   Follow us on        

बांदा: बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले विद्यार्थ्यांसमोर अचानक खाली कोसळली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मुख्याध्यापिका आत्लेषा कांबळी या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ही घटना घडली असून, काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या गंभीर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद वीर, राकेश विरनोडकर, प्रदीप कळंगुटकर, राजदीप पावसकर आणि महेंद्र मांजेरकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. गेल्या पंधरा दिवसांत बांदा परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या छातासंदर्भातील ही तिसरी गंभीर घटना असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा छप्पर दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप साईप्रसाद काणेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी केली. शिक्षण विभागाने तातडीने छप्पर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दूरवस्था आणि खेळणी साहित्यांची झालेली मोडतोड निदर्शनास आणून दिली असून, ऋतिका नाईक यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

‘शक्तीपीठ’ तीन महामार्गांना जोडेल! – आमदार दीपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

​मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.

तब्बल सहा वर्षानी राजधानी एक्सप्रेस सावंतवाडीत थांबली; जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला पुन्हा एकदा थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही गाडी स्थानकात दाखल होताच, कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक रेल्वेप्रेमींनी तिचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी रेल्वेची विधिवत पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या दोन्ही चालकांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून हा आनंदोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.

​या कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी कोरोना काळातील अडचणींना उजाळा दिला. कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता, मात्र संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता राजधानी एक्सप्रेससह गरीब रथ आणि मंगळूरू एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या यशामागे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मोलाच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच सावंतवाडी स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ हे नाव प्राप्त झाले असून, या नामासाजेसा प्रवाशांचा विकास व सुविधा भविष्यात येथे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​या स्वागताच्या सोहळ्याला संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजीनदार भूषण बांदिवडेकर यांच्यासह सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, तसेच मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रेल्वेप्रेमी उपस्थित होते.

सावंतवाडी: ४५ प्रवासी असलेली कदंबा बस कलंडली; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावकडून दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली, ज्यामध्ये ४५ प्रवासी बालबाल बचावले असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली आहे. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. या वेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदूरीच्या काही फूट अंतरावर कलंडली.

​या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते, ज्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तसेच या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.

या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस अलिकडेच कलंडली आणि दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

मुंबई – मंगळुरू एक्सप्रेसचे सावंतवाडी स्थानकावर जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २७ जुलै:

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या बहुप्रतिक्षित मंगळुरू एक्सप्रेसच्या थांब्यामुळे येथील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

​रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. १६ वर्षे या गाडीसाठी प्रयत्न सुरू होते. गेली ४ वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर आज मोठं यश आम्हाला मिळालं आहे. सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाला. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मंत्री व सर्व जनप्रतिनिधींचे आभार मानतो. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असं नाव या स्थानकाला मिळालं आहे. त्यामुळे त्या नावासा शोभेल असं टर्मिनस जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून निर्माण व्हावं, अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सावंतवाडीकर उपस्थित होते.

​यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री. मिहीर मठकर, उपाध्यक्ष श्री. सागर तळवडकर, मुंबई विभागाचे श्री. गणेश चमणकर, श्री. मिहीर गावडे, श्री. नंदू तारी, श्री. देवेंद्र मातोंडकर, श्री. सुभाष शिरसाट, ॲड. तेजस परब, श्री. नरसु रेडकर, श्री. शेखर पाडगावकर, सौ. सान्वी तळवडकर, कु. राशी परब, कु. प्रेरणा पोकळे, श्री. बसवराज गुरव, श्री. अश्वैफ गवस, श्री. भावेश भिसे, तसेच सर्व रिक्षाचालक आदी उपस्थित होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search