नवी दिली :शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची, याबाबतची कार्यवाही सुरू करायला परवानगी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबतचा निर्णय घेण्यापासून रोखावं, अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र कोर्टाने ही मागणी मान्य न केल्यान ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे
आता शिवसेना नेमकी कुणाची? शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू होणार आहे.या सुनावणीमध्ये शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोग पुढे काय करणार?
निवडणूक आयोग बहुमताच्या आधारावर निर्णय देणार आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तसंच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, याची सगळ्यात आधी पडताळणी करेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार हे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसंख्येने आहेत, पण पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावं लागणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रही देण्यात येत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोग शिवसेनेचे आमदार-खासदार तसंच पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावण्याचीही शक्यता आहे. यानंतर ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मात्र ठाकरे गट आणि शिंदे गट यांना निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात.
सध्याची परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधींचे संख्याबळ शिंदे गटाच्या बाजूने जास्त असल्याचे दिसत आहे. पण गटाच्या पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ जास्त दाखवणे हे ही महत्त्वाचे आहे.