Konkan Railway News :रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा, तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी दिले. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्री चव्हाण यांच्या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असून लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणा-या रस्त्यांचे मजबूतीकरण, नुतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले
Vision Abroad