मुंबई :दादर रेल्वे स्थानका फलाट क्रमांक-४ आणि ५ क्रमांक फलाटाला दुहेरी जोडणी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. फलाट क्रमांक-४ आणि ५ यांच्यामध्ये फलाट क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने ह्या हालचाली सुरू केल्या आहेत.
स्थानकातील फलाट क्रमांक-३वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल थांबतात. फलाट ४ आणि ५ यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे कुंपण आहे. ते हटवून लोकल पकडण्यासाठी फलाट ५चा देखील पर्याय खुला करून देण्याचे काम सुरू आहे. सर्व तपासणीअंती आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक अबाधित ठेवून हे शक्य झाल्यास फलाट क्रमांक ‘४ ए’ या नव्या फलाटावरून प्रवाशांना लोकल पकडणे शक्य होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फलाट ५वरून अगदी मोजक्याच मेल-एक्स्प्रेस धावतात. या गाड्यांच्या वेळा वगळता अन्य वेळेत या फलाटावर शुकशुकाट असतो. आपत्कालीन स्थितीत या फलाटावर लोकल वाहतूक होते. यालगत असलेल्या फलाट-४वर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मुख्य पुलाच्या आणि स्वामी नारायण मंदिरदिशेकडे उतरणाऱ्या पुलांच्या पायऱ्यांची जोडणी फलाट ५वर आहे. फलाटावर ठाण्याच्या दिशेला लिफ्ट आणि बंद अवस्थेत रेल्वे कार्यालय आहे. कार्यालय आणि लिफ्टची नव्या ठिकाणी उभारणी आणि पुलांच्या पायऱ्या ही प्रमुख आव्हाने रेल्वे प्रशासनासमोर आहेत. संबंधित तज्ज्ञ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फलाट ४वरील स्टॉल, अकार्यान्वित पाणी देणारे मशिन आणि प्रवासी वर्दळीसाठी अडथळे असणारी अन्य बांधकामे हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे फलाट ३ आणि ४वर अधिक जागा उपलब्ध होणार आहे. मार्च २०२३अखेर हे काम पूर्ण होणार आहे.
Vision Abroad
Vision Abroad