सिंधुदुर्ग :आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान देवगड येथे समुद्रात अचानक एका नौकेने पेट घेतला.नौकेवरील मच्छिमारांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण नौकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गणपत निकम यांच्या मालकीची पुण्यश्री नावाची हि नौका पहाटे ४ वाजता समुद्रात मच्छिमारीसाठी नेण्यात आली होती. सकाळी आठ वाजताच्या सुमारास ह्या नौकेला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नौकेवरील मच्छिमारांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचा प्रयत्नांना यश आले नाही आणि आग अजून भडकत गेली. पुढील धोका ओळखून मच्छिमारांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या आणि जवळपासच्या नौकेंचा आश्रय घेतला.
येथील स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने सुमारे ४ तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि हि नौका किनाऱ्यावर आणण्यात आली. महेश सागवेकर, बापू सागवेकर, हितेश हरम, आकाश हरम, बाबू वाडेकर, अक्षय हरम, चेतन पाटील, नागेश परब, बाबू कदम यांनी आग विझवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.
आगीचे नेमके कारण समजले नाही.ह्या आगीमध्ये २ मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार केले आहेत.