Mumbai Goa Highway News :मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दावा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकार्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. मागील 14 वर्षांपासून रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.
महामार्गाचे अपुरे काम आणि त्यामुळे लोकांना ये-जा करताना त्रास होऊ नये म्हणून ह्या मार्गावरील निदान खड्डे भरून काढावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोकणसुपुत्र अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.
(Also Read>मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी ‘स्वाक्षरी’ मोहीम… मुंबई आणि आजूबाजूच्या ‘ह्या’ शहरांत होणार आयोजन..)
न्यायालयात सादर केलेल्या NHAI च्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे पूर्ण काम झाले आहे असे लिहिले आहे. पण जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमा केलेल्या फोटों आणि व्हीडिओंमध्ये ह्या पट्ट्यातील खड्डे स्पष्ट दिसत होते. हा पुरावा अॅड ओवेस पेचकर यांनी न्यायालयात सादर करून NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा खोटेपणा सिद्ध केला. न्यायालयाने ह्या सर्व प्रकाराबाबत फटकारले असता आपण दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत ह्या मार्गावरील खड्डे बुजवून देवू आणि 2023 अखेपर्यंत हे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करू असे NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी ह्यावेळी सांगितले आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी असेल असे जाहीर केले. तत्पूर्वी सविस्तर प्रतिज्ञा पत्र सादर करा असे आदेश NHAI दिले आहेत.