सिंधुदुर्ग : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लागत असलेल्या दुकानांपैकी दोन दुकांनाना आज पहाटे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही पण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची माहिती अशी- धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लगत अनेक दुकाने आहेत. यातील विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान असून त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना ही आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी अन्य लोकांशी संपर्क साधत याची माहिती दिली. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंब ही दाखल झाला. यात दुकानातील नव्या व जुन्या अशा एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचरसह संपूर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळून खाक झाले. यात मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. तेही जळून नुकसान झाले.
(Also Read >कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)
दुकान मालक, स्थानिक नागरिक तसेच मंदार केणी, महेश सारंग, राजू बिडये, भाई कासवकर यासह अन्य नागरिक, नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. मात्र दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानांना लागूनच अन्य काही दुकाने आहेत. त्यांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गंगाराम कोकरे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होती.
Vision Abroad