सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
या पुलामुळे समुद्र किनार्यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.
तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.
(Also Read>आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…)
Vision Abroad