सिंधुदुर्ग : श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेच्या प्रथम पूजेसाठी यावर्षी प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासित केल्यामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि प्रशासनाच्या समन्वयाने नियोजन सुरू असल्याची माहिती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
कुणकेश्वर यात्रा यंदा १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यानिमित्ताने देवस्थानच्यावतीने पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, अभय पेडणेकर यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते.
कुणकेश्वर मंदिर हे पांडवकालीन पुरातन मंदिर असून याठिकाणी स्वयंभू पिंड आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते. श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचा आख्यायिका आहे.
Vision Abroad